December 31, 2014

जानेवारी २०१५ - पत्रक


श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ डिसेंबर २०१४

नाम हे चिरंतन आहे, त्याला समाप्ति नाही.
[तेरा कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेले निरूपण] 

 

 

खरे पाहिले म्हणजे आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळेच; कारण नाम हे चिरंतन आणि काळापलीकडचे आहे. त्याचे माहात्म्य कळायला फार कठीण आहे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम. ते घेतल्याने तो आपलासा होईल. देव नामाशिवाय राहू शकत नाही. त्रिवेणीसंगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते; आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो.
तुम्ही लोकांनी सेवा फार केली. खरोखर, जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवील अशा रीतीने उत्सव साजरा केलात. आता रामाजवळ असे काही मागा की पुन्हा काही हवेसे वाटणार नाही. आपण जर काही अगदीच क्षुल्लक मागितले तर तो हसेल, की मी एवढा दाता असताना हे क्षुल्लक काय मागतात ! तर आता त्याच्याजवळ, 'देवा, माझे समाधान निरंतर टिकू दे, आणि तुझ्या नामाचे प्रेम दे,' हेच मागणे मागा. भगवंताला पूर्ण शरण जाऊन सांगा, ' भगवंता, मी हा असा आहे, यात सुधारणा होणे माझ्या हाती नाही. रामा, मी तुझे नाम मरणापर्यंत घेईन तरच जगेन.' स्त्रियांनी एकच करावे, पति देवासमान मानून देहाने त्याचे व्हावे आणि मनाने देवाचे व्हावे. प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा. कुठेही गुंतून राहू नये, कोणत्याही उपाधीत सापडू नये. उपाधीरहित राहण्याचे साधन म्हणजे उपाधीरहित असलेले भगवंताचे नाम सतत घेणे. नाम घेतल्याने श्रद्धा दृढ होईल आणि नामाची गोडी लागेल. जसे पाणी गोठल्यावर बर्फ होतो, त्याचप्रमाणे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हांला भेटावेच लागेल. तुम्ही अखंड नाम घेत राहा, देव तुम्हाला खात्रीने भेटेल या बद्दल शंका बाळगू नका.
परमार्थ आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालावी. परमार्थाबद्दल नसत्या शंका घेऊ नयेत. आजच्या या दिवसापासून, आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो, तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारा; आणि आतापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतलेत तितक्याच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आवडीने आणि निष्ठेने ते घ्या. अंतकाळी अगदीच सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे; नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे. असे नाम जो घेतो त्याला देहाच्या सुख-दुःखाची जाणीवच राहणार नाही. तो आनंदात राहील . मला खात्री आहे, राम त्याचे कल्याण करील.

३६६. नामात शेवटचा श्वास जाण्याकरिता आतापासून सतत नामात राहण्याचा प्रयत्‍न करा.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 30, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० डिसेंबर २०१४

शेवटी करावी प्रार्थना एक । 

 

 

सकाळी लवकर उठावे । भगवंताचें स्मरण करावे ।
हातपाय स्वच्छ धुवावे । मानसपूजा करावी ॥
हृदयांत ठेवावे रामाचे ठाण । षोडशोपचारे करावें पूजन ॥
गंध फूल करावे अर्पण । नैवेद्य करावा अर्पण । मनाने प्रसाद घ्यावा जाण ॥
शेवटी करावी प्रार्थना एक । 'रामा, तुला मी शरण देख ॥
वासना न उठों दुजी कांही । नामामध्यें प्रेम भरपूर देईं ॥
सदा राखावें समाधान । हें तुझें कृपेवांचून नाही जाण ॥
नीतिधर्माचे आचरण । तुझें कृपेने व्हावे जतन ॥
न मागणें आता कांही । मी तुझ्यासाठी जिवंत पाहीं ।
आतां द्या नामाचें अखंड स्मरण । देह केला तुला अर्पण ॥
रामा, जें जें कांही तूं करी । त्यांत समाधानाला द्यावें पुरी ।
आतां, रामा, एकच करीं । तुझा विसर न पडो अंतरीं ॥
तुझे नामाची आवडी । याहून दुजें मागणें नसावें उरी ॥
हेंचि द्यावे मला दान । दीन आलो तुज शरण ॥
रामा, मला एकच द्यावे । तुझें अनुसंधान टिकावें ॥
नको नको ब्रह्मज्ञान । काव्य-शास्त्र व्युत्पत्तीचें ज्ञान ॥
कामक्रोधाचे विकार । जाळताती वारंवार ॥
आतां तारीं अथवा मारीं । तुझी कास कधीं न सोडी ॥
आतां, रामा तुझा झालों । कर्तेपणांतून मुक्त झालों ॥
माझें सर्व ते तुझे पाहीं । माझें मीपण हिरोनि जाई ॥
रामा, आतां एकचि करी । वृत्ति सदा राहो तुझेवरी ॥
रामा, मी कोठें जावें ? । तुजवांचून कोठें राहावें ? ॥
देहबुद्धीची नड फार । ती करावी रामा तुम्ही दूर ॥
आजवर विषय केला आपलासा । न ओळखतां पडलों त्याच्या फांसा ॥
रामा सर्व सत्ता तुझ्या हाती । समाधान राहील अशी करावी वृत्ति ॥
तुझेजवळ मागणें दुजें नाहीं । हृदयांत तुझा वास अखंड राही ।
आतां तुझ्यासाठीं माझें जीवन । तुला तनमन केलें अर्पण ॥
तुमचें चिंतनीं लागावें मन । कृपा करा रघुनंदन' ॥
ऐसें करावें रामाचें स्तवन । रक्षणकर्ता एक भगवंत मनीं आणून ॥
ऐसें व्हावें अनन्य दीन । तात्काळ भेटेल रघुनंदन ॥

नामापरतें न माना दुजें साधन । जैसें पतिव्रतेस पति प्रमाण ॥
नामापरतें न मानावें सत्य । ज्यानें राम होईल अंकित ॥
हेच सर्व साधुसंतांचे बोल । कोणीही न मानावे फोल ॥
नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण । मनीं असो, नसो, करावें नामस्मरण ॥
नामाविण दुजें काहीं । सत्य सत्य त्रिवार नाहीं ॥

३६५. नामाच्या संगतीं । ज्या व्यवहाराची प्राप्ति । तोच व्यवहार जाई । भगवत्सेवेप्रति ॥

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 29, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ डिसेंबर २०१४

मीपणाचे विसर्जन करून सुखदुःखातीत राहावे. 

 



भक्ति म्हणजे संलग्न होणे. विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ति झाली, परमेश्वराची कशी होईल ? मीपणा आला की संकल्प उठतात, आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात. मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तीत कमीपणा आहे. प्रपंचाचा त्याग करून, बैरागी होऊन मठ बांधला, पण मठाच्या बंधनात पडला ! देवाला दागिने घातले, का, तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून ! चांगल्या कृत्यांतसुद्धा मी कसा लपून बसलेला असतो बघा ! थोडक्यात म्हणजे, मीपणाचे विसर्जन केले पाहिजे. साधू कर्तेपण परमेश्वराला देतात. वास्तविक आपण कर्ते आहोत कुठे ? आपण कर्ते म्हटले, परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे ? पण नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे. 'हे सर्व ईश्वराचे आहे' हेच सार वेदश्रुती सांगतात. "हे सर्व रामाचे असून तोच सर्वांचा कर्ता आहे" असे संत सांगतात; दोघांचेही सांगणे एकच. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावे लागणार नाही. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे, हीच खरी उपासना. मी काही नाही, कोणीतरी बाहुली आहे, असे समजावे. एक भगवंत तेवढा माझा, असे म्हणावे.
संताजवळ आसक्ति जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते. म्हणून आपण नेहमी सत्समागमात असावे. संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार चांगला परिणाम होतो. आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावेसे वाटेल; ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर त्याने जपच करू, माळेने काही आपण कुणाला मारणार नाही. आपल्या पोषाखात, वागण्यात, बोलण्यात, सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते; म्हणून संताचा सहवास नेहमी ठेवावा. गाय जशी वासरामागून येते, तसे संत नामामागून आलेच पाहिजेत. ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील, आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात् आलाच म्हणून समजा. दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो, तसे आपण संताच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो. म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले, असे मानले पाहिजे. सत्संगतीने साधकाची वाढ होते. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. संतांना भक्तिचे व्यसन असते. ते नेहमी नामात असतात. संत हे भगवंतावाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत; म्हणून ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावावयाला संसारी संतच खरा उपयोगी पडतो.


३६४. सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजेच सर्वस्व रामास अर्पण करणे आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 28, 2014

पौष महिना - ३



पौष महिन्या संबंधी  संग्रहीत माहिती  


श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ डिसेंबर २०१४

वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे.
[ गायत्रीपुरश्चरण झाल्यावर वैदिक ब्रह्मवृंदासमोर झालेले प्रवचन. ] 

 

    

तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी, भाग्यवान, आणि पूज्य आहांत. इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली हे तुमचे फार मोठे उपकार आहेत. तुमची योग्यता खरोखर मोठी आहे ! त्याच्या उलट माझी स्थिती आहे. मी एक अज्ञ मनुष्य आहे. मला वेदविद्येचा गंध नाही, ग्रंथांचे ज्ञान नाही. मी रामरायाचा एक दीन दास आहे. त्याच्या नामावर माझे प्रेम आहे. माझे म्हणणे आपण प्रेमाने ऐकून घ्यावे.
वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानली आहे हे बरोबर आहे, कारण गायत्री उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठविलेले आहे. गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरे वैराग्य आणि पावित्र्य असावे लागते. पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहात असत. कंदमुळे हा त्यांचा आहार असे, इंद्रियसंयम हा त्यांचा मुख्य आचार असे. सत्य हेच त्यांच्या वाणीचे भूषण असे. काम, क्रोध, आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसे होती. परंतु आता काळ पालटला आहे. ज्या प्रकारचे जीवन ऋषिलोक जगत असत, त्यापैकी आपणाजवळ आता काहीच शिल्लक उरलेले नाही. ऋषींचे राहणे, खाणे, पिणे, इंद्रियसंयम, सत्यनिष्ठा यापैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरले आहे ? त्याकाळी ऋषींनी पर्जन्यसूक्त म्हटले की पाऊस पडत असे, आणि तेच सूक्त आज म्हटले तर साधा वारादेखील सुटत नाही. ऋषींच्या अंगी तपश्चर्येचे सामर्थ्य होते, म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापालादेखील होती. जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की, वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत् राहिलेली नाही, आणि वैदिक कर्मे यथासांग घडणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत, आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधने सुटत चालली, म्हणून संतांनी कळवळून 'नाम घ्या' असे सांगितले. नाम हे आगंतुक नाही. आदि-नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो 'ॐ' चा ध्वनी केला, ते नाम होय. म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती अशी की, आपण नाम घेत जावे. किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे .



३६३ वैदिक कर्मांना आहाराविहाराची बंधने आहेत. भगवंताच्या नामाला ती नाहीत.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 27, 2014

पौष महिना - २

पौष महिन्या संबंधॆ संग्रहीत माहिती  

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ डिसेंबर २०१४

भगवंताचे प्रेम कसे उत्पन्न होईल ते पाहावे. 

 



चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झाले असे म्हणता येणार नाही. संतांचे दर्शन झाले, पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तिथे कसे दिसतील ? आमची प्रपंचाची नड संताने दूर करावी, हे म्हणणे चुकीचे नाही का ? ती दूर करण्याकरिता प्रापंचिकाकडे जावे, संताकडे नव्हे. आता, दुखणे बरे व्हावे म्हणून जरी 'राम राम' म्हटले, तरीसुद्धा ते वाया जात नाही. सत्पुरुषांचे अत्यंत उपकार असतील तर रोगाचे निदान काय आहे ते त्यांनी शोधून काढले. आपल्याला हवेपणाचा रोग झाला आहे ! हवेनकोपण जिथे आहे, तिथे समाधान नाही हे खास. आपल्या भजन-पूजनाचा हेतू कोणता असेल ? तो समजून भजन-पूजन करा म्हणजे झाले ! आज भगवंत हवा असे म्हणणारे लोक थोडेच आहेत; आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो, तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो. ज्याला भगवंताकरताच भगवंत हवा, त्याला समाधान खास मिळेल. त्याला कशाचीही अट नाही. त्याला वयाची मर्यादा नाही. विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही; तळमळीची मर्यादा आहे.
खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही. आपण नुसते बोलतो, कृति काहीच करीत नाही, म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असे आपल्याला वाटते. न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात. अर्जुनाला भगवंतांनी युद्धाला उभा राहा म्हणून सांगितले. अर्जुन सबबी सांगू लागला. देवास फार वाईट वाटले. देहबुद्धीमुळे, अभिमानामुळे, भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात. व्यवहारात सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे. प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो, आणि काशीस जायचे तर, योग येत नाही असे म्हणतो ! आज्ञेला सबब सांगणे हे मोठे पाप आहे. एखाद्या सावकाराला सांगितले की तुझ्याजवळचे सर्व काही देऊन टाक, तर तो कदाचित् देईलही; पण 'मी' दिले, ही आठवण नाही जाणार त्याची. जो द्यायला सांगतो तोच दाता असतो, हे तो विसरतो.
व्यापार्‍याला स्वप्न व्यापाराचेच पडते, त्याप्रमाणे आपण ज्याचा सहवास करावा त्याचे प्रेम येते. भगवंताविषयी प्रेम कसे उत्पन्न होईल ते पाहावे. सहवासाने, निश्चयाने, किंवा आपलेपणा विसरल्याने, परमेश्वराचे प्रेम येते. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत ? मुंबईत राहणार्‍याला मुंबई आवडते, याचे कारण सहवास. गांजा प्रथम ओढताना जरी ओकारी आली, तरी सवयीने त्याचे प्रेम येऊ शकते. नापसंत नवर्‍याशी जरी लग्न झाले, तरी मुलगी निश्चयाने त्याच्यावर प्रेम करायला शिकते; म्हणजेच प्रेम निश्चयाने येऊ शकते. राम आपल्या हृदयात आहे ही भावना ठेवू या. 'रामाहून मी वेगळा नाही, आणि तो माझ्या हृदयात आहे.' असा दृढ निश्चय करून ही भावना वाढविली पाहिजे.

३६२. आपले प्रेम प्रपंची लावले आहे, ते रामनामी लावायला पाहिजे.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 26, 2014

पौष महिना



पौष महिन्या संबंधॆ संग्रहीत माहिती  

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ डिसेंबर २०१४

मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या. 

 



जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म, स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निःस्वार्थी बनता आले नाही. खरे म्हणजे, आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निःस्वार्थी बनता येणार नाही. मन कोणत्या साधनाने आम्हांला आवरता येईल ? योग, याग इत्यादि साधने त्यासाठीच सांगितली आहेत, पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का ? ह्या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही. कारण आज एक नामच भगवंताने अवताररूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे. तेव्हां, मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या. नाम घेत असताना, मनाचे स्थैर्य बिघडविणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्‍न करा. मनाला सर्वांत मोठा विकार बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान. ह्या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे. भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते. हिरण्यकश्यपूच्या वेळी भगवंताने अवतार घेतला' पण देव समोर उभे असतानासुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तरवारीकडे गेला ! यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल. तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतले पाहिजे.
मनाची स्थिरता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे राग. हा राग फार भयंकर असतो. मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या याने धुळीस मिळविली आहे. हा राग आवरण्यासाठी, आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतले पाहिजे. व्यवहारात आपल्याला नीतीची बंधने घालून दिली आहेत, ती सर्व आपण पाळली पाहिजेत. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. ही बंधने कशासाठी घातली आहेत याचे मर्म समजून घेऊन वागले तर राग आवरता येईल. आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेले, काम, क्रोध, मोह, इत्यादि विकारांनाही पायबंद पडेल. याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपले मन भगवंताकडे विनम्र करा. भगवंताकडे जाऊ लागा, मन आपोआप तुमच्या मागे येईल, कारण तो त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचे मन तुम्हाला आपण होऊन साहाय्य करील याची खात्री बाळगा.



३६१. नाम सुरुंगाप्रमाणे आहे. विकाररूपी मोठाले खडक ते फोडून टाकते.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 25, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ डिसेंबर २०१४

भगवंताचे स्मरण हेच प्रत्येक साधनाचे मर्म. 

 

    

एका गावाहून दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या, आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते. सबंध दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोचल्यावर गाडीवानांनी गाड्या सोडल्या, सोने आणि दगड अधिकाऱ्यांच्या हवाली केले आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडबाच घातला. तसे, भगवंताच्या दृष्टीने, विद्वान आणि अडाणी दोघेही सारखेच. सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असे मुळीच नाही. विद्वान काय किंवा अडाणी काय, दोघांनाही बुडविण्याइतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो; विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो, इतकेच. विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधनरूप आहे; साध्यरूप नाही. विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. साधेभोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरून जातात, पण हे विद्वान लोक, भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा आणि आपला संबंध काय आहे, त्याचे नाम त्याच्यापर्यंत पोहोचते की नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीने घ्यावे, इत्यादि गोष्टींची चिकित्सा करीत बसतात. आणि ती इतकी करतात की, शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो, आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. म्हणून शहाण्या विद्वानाने, चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी.
ज्याच्या अंगी मीपणा आहे, त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायश्चित्त देतो. पण ज्याच्या अंगी मीपणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो. समजा आज आपल्या हातून चूक झाली, अगदी अजाणतेपणाने झाली, तरी आपण जर पश्चात्ताप पावून भगवंताला शरण गेलो तर खात्रीने तो क्षमा करतो. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.
प्रत्येक भक्ताने साधनाचे कष्ट स्वतःच सोसले पाहिजेत. कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काहीच करू शकत नाही. फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही. आपले मन आपणच आवरले पाहिजे, आणि आपल्या वृत्तीला आपणच वळविले पाहिजे. साधन करीत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत. भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत. इतर साधनांनी कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते. पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणुन ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी.

३६०. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 24, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ डिसेंबर २०१४

अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. 

 



सत्पुरुषाजवळ राहून मनुष्य जर आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही. जो आज्ञापालन करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो. तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यावाचून राहणार नाही. प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे; आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे.
विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत. ते भगवंतानेच दिले आहेत. म्हणून जीवनात त्यांना योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना, व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे, विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. विकारांना आपण वापरावे, विकारांनी आपल्याला वापरू नये.
पहिल्याने, प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे. चिकाटीने ते प्रेम वाढवावे, म्हणजे नंतर वस्तूंचे महत्त्व निघून जाते आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो. भगवंताला एकदा धरला की कोणत्याही परिस्थितीमधे त्याला सोडून नये. त्याचे नाम घेतल्याने हे साधते, म्हणून नाम घेत जा असे मी सतत सांगत असतो. प्रपंचात आपणे किती कष्ट करतो ! तितका मोबदलाही मिळत नाही. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते.
ज्ञानमार्ग असो किंवा भक्तीमार्ग असो, खरा 'मी' कोण हे ओळखण्यासाठीच सर्व साधने असतात. आज आपल्यापाशी खोट्या 'मी' चे प्राबल्य आहे, ते नाहीसे करणे जरूर आहे. खोटा 'मी' गेला की खऱ्या 'मी' ला कुठून आणायची जरूरी नाही. तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वतःसिद्ध आहेच. म्हणून खोट्या 'मी' ला मारण्यासाठी भगवंताचे दास्यत्व पत्करणे फार आवश्यक असते. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही; त्यातच भक्ती जन्म पावते. नामस्मरण हे भक्तीमार्गाचे मुख्य साधन आहे. नामस्मरणाने भगवंताचे प्रेम अनायासे उत्पन्न होते. ते नाम तुम्ही निष्ठेने आणि आनंदाने घ्या, हेच माझे सांगणे आहे.

३५९. काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 23, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ डिसेंबर २०१४

नाम हे रूपापेक्षा व्यापक आहे 

 

   

समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की, 'आनंद म्हणजे काय ?' तर एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणाल की, 'हे पहा, इथे आनंद आहे !' इतकेच नव्हे तर याप्रमाणे आनंदाने खेळणारी मांजराची पिले, उड्या मारणारी लहान वासरे, हसणारे स्त्री-पुरुष, फुलांनी बहरलेल्या लता, यांच्याकडे बोट दाखवून, 'इथे आनंद आहे' असे तुम्ही सांगाल. पण हे काही माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर नव्हे. 'आनंदी वस्तू कोणत्या आहेत, असा माझा प्रश्न नसून 'आनंद मला दाखवा असे मी विचारले होते. आनंदी वस्तूमध्ये आनंद राहतो, म्हणून वस्तू हा काही आनंद नव्हे. लहान मूल हेच जर आनंद असेल तर मोठे स्त्री-पुरुष आणि मांजरीची पिले आनंदयुक्त असणार नाहीत. अर्थात् आनंद हा एकच असला पाहिजे; कारण सर्व ठिकाणी आढळणाऱ्या आनंदाला एकच शब्द आपण वापरतो. आपण जो जो माणूस पाहतो, तो तो निराळा असतो, तरी सर्वांना आपण माणसेच म्हणतो, कारण प्रत्येक माणसामध्ये 'मनुष्यपणा' आहे. तो आपल्या इंद्रियांना दिसत नसला तरी मनाने ओळखता येतो, आणि त्याचे अस्तित्व 'मनुष्य' या शब्दाने सांगता येते. 'मनुष्यपणा' हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळेच आहे. प्रत्येक वस्तूचे बाह्यरूप तिच्या नामामुळे टिकते.
आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहणारा 'आनंद' एकच असतो. म्हणजे एकच नव्हे, तर अनेक रूपे आली आणि गेली, तरी नाम आपले शिल्लक राहते. आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री-पुरुष जन्माला आले, जगले आणि मृत्यु पावले, तरी 'मनुष्यपणा' आहे तसाच आहे. हा नियम सर्वत्र लावला तर असे दिसेल की, चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या, पण 'चांगलेपणा' कायम आहे. सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या, पण 'सौंदर्य' कायम आहे. आनंदी वस्तु आल्या आणि गेल्या, पण 'आनंद' कायम आहे. लाखो जीव आले आणि गेले, पण 'जीवन' कायम आहे. रूपे अनेक असली तरी नाम एकच असते. म्हणजे नाम हे अनेकांत एकत्वाने राहणारे असते. याचा अर्थ असा की, नाम हे रूपापेक्षा व्यापक असते. रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते. नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देश-काल निमित्ताच्या मर्यादा, इत्यादि कोणतेही विकार नाहीत. म्हणून नाम हे पूर्वी होते, आज आहे, आणि पुढेही तसेच राहील. नाम हे सत्‍स्वरूप आहे. नामातून अनेक रूपे उत्पन्न होतात, आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच होय. म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ असल्यासारखाच आहे.


३५८. माझे बोलणे प्रत्येकाला कळते; ज्याची जेवढी तयारी
असेल तेवढे त्याला कळते, पण वाया कुठेच जात नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 22, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ डिसेंबर २०१४

कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका. 

 



आकाशाला भिऊन पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच; त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. 'प्रयत्‍न केला असता तर बरे झाले असते' असे जोपर्यंत वाटते, तोपर्यंत प्रयत्‍न हा अवश्य करावा. यश किंवा अपयश देणारा परमात्माच, असे समजून प्रयत्‍न करावा. सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावे. तुझी सेवा किती दिवस करू असे परमेश्वराला विचारणे म्हणजे सेवेत कमीपणा आलाच. तसेच, त्याच्या नामाबद्दलही मुदत कशी घालता येईल ? विषय किती दिवस भोगू, असे नाही आपण म्हणत ! मग नामाबद्दलच का असे विचारावे ? आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे. प्रपंचामध्ये कसलेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका.
मनाला रिकामे ठेवले की ते विषयाच्या मागे धावलेच समजा. म्हणून आपले मन नेहमी गुंतवून ठेवावे. उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पागोष्टी करणे, चेष्टा-विनोद करणे, वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ ठेवावा; हेच अनुसंधान होय. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय; त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करू या. आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचे नाम होय. म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी. नामाचे अनुसंधान टिकेल अशीच उपाधी बाळगावी. नाम नुसते घेतल्याने काम होईल; पण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल. नाम मुखी आले की सत्कर्मे आपोआप होऊ लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाही.
आपण उगाचच सबबी सांगत असतो. काम असेल त्या काळी कामाची सबब, पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता, उगाचच गप्पा, नाही तर निंदा-स्तुती, किंवा इतर खेळ खेळण्यात वेळ घालवतो. तसे करू नये. आपले मन उनाड आहे. त्याला एके ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही. त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला लावले पाहिजे. नामामध्ये भगवंताची शक्ती असल्याने नाम घेणाऱ्याची देहबुद्धी क्रमाक्रमाने कमी होते आणि नाम स्थिरावते. नित्य नामस्मरण केल्यावाचून अंती ते येणार नाही. जागेपणी अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल, झोपेच्या वेळी स्मरण झाले तर रात्री स्वप्नात तेच होईल, आणि असा सदोदित ध्यास ठेवला तर मरणाच्या वेळीही तेच स्मरण राहील.

३५७. नाम घेता घेता नामाशी इतके तादात्म्य व्हावे की, मी नाम घेत आहे हेसुद्धा विसरून जावे.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ डिसेंबर २०१४

भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये

  


एक मुलगा घरातून पळून गेला. तेव्हां त्याची आई म्हणाली, ' तो कुठेही राहू दे, पण खुशाल असू दे.' तसे, तुम्ही कुठेही राहा पण नामात असा. नाम तेवढे बळजबरीने घ्या. श्रद्धेने घेतले तर जास्त बरे; वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरे ! वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यांमध्ये मध घालावा लागतो, काहीमध्ये दूध, तूप किंवा पाणी घालावे लागते. तसे भगवंताचे प्रेम लाभण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी, त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला. 'मी ब्रह्म आहे' या अनुभवातसुद्धा मीपणा आहे. नाम त्याच्याही पलीकडे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचे सतत स्मरण ठेवावे; त्यामुळे प्रपंच सोपा होतो. नामाची सत्ता फार बलवत्तर आहे. जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल. नाम हे त्याच्या शत्रूलाही मदत करते, तर ते आपल्याला मदत करीलच. रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये. पुढे रूप आपोआप येऊ लागेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचे रूप आहे, म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते अपूर्ण नाही. अडाणी लोकांना नाम घ्यायला सांगितले तर ते लगेच घेणे चालू करतात, परंतु विद्वान लोक मात्र 'नामाचे प्रेम असेल तरच मी नाम घेईन' असे म्हणतात. विषयरूपी सापाचे विष उतरलेले नसल्याने भगवंताचे अमृतासारखे गोड नाम आपल्याला गोड लागत नाही. याकरिता या क्षणापासून नाम घ्यायला सुरुवात करावी. आपण रामाचे व्हावे आणि त्याला जे आवडते ते करावे. रामाला जाणतेपणाने शरण न जाता नेणतेपणाने शरण जावे. भगवंताला अनन्य शरण जाऊन अनुभव घ्यावा. नीतीने वागावे, भक्ती चांगली करावी, मग राम प्रसन्न होतो.
ज्ञान श्रेष्ठ खरे, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही; कारण भगवंताहून कधी विभक्त नसतो तो भक्त होय, आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एकरूपत्व असते; म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होते आणि ते भक्तीवरच जगते. खरा भक्त ज्ञानीच असतो. भगवंतासाठी भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखांमध्ये एखादाच असतो. खरी भक्ती ती हीच समजावी. नामाकरिता आपण नाम घ्यावे, राम ठेवील त्यात समाधान मानावे. भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये, तो साध्य असावा. ज्याने भगवंताच्या नामात आपल्या आयुष्याचा व्यय केला, त्याने जन्माला येऊन सर्व साधले आणि जन्माचे सार्थक करून घेतले.


३५६. ज्ञानी होऊन नामस्मरण करणे, किंवा भक्त होऊन
नामस्मरण करणे, एकच आहे. दोन्हीकडे भगवत्प्रेम मुख्य आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 20, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० डिसेंबर २०१४

नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावें सत्य ॥ 

 



प्रारब्धानुसार देहाची गति । तेथे न गुंतवावी आपली वृत्ति ॥
प्रारब्धाने देहाची स्थिति । आपण न पालटूं द्यावी वृत्ति ॥
देह प्रारब्धें जातो । सुखदुःख भोगवितो ॥
जें जें काहीं केलें । ते ते फळाला आलें ।
म्हणून देहाची गति । ते पालटणें नाहीं कोणाचे हातीं ॥
पांडव परमात्म्याचे सखे झाले । तरी वनवासांतून मुक्त नाहीं झाले ॥
सुदामा भगवंताचा भक्त झाला । पण दारिद्र्यांत राहिला ॥
म्हणून देह प्रारब्धावर टाकावा । जें होईल तो आनंद मानावा ॥
जैसें दुःख येते प्रारब्धयोगें । सुख आहे त्याचे मागें ॥
दोहोंची न धरावी चाड । नामाची ठेवावी आवड ॥
चित्त ठेवावें भगवंतापायीं । प्रारब्ध आड येऊं शकत नाहीं ॥
देहाचे भोग देहाचे माथां । कष्ट न होती रघुनाथ स्मरतां ॥
प्रारब्धानें आलेले कर्म करीत जावें । त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे ॥
साधुसंत देवादिक । हे प्रारब्धांतून नाही सुटले देख ॥
जीवनांतील आघात प्रारब्धाचे अधीन ।
समाधान नसावें त्याचेवर अवलंबून ।
त्यांत रामाचें स्मरण देईल समाधान ॥
दुष्टाची संगति प्रारब्धानें जरी आली । तरी रामकृपेखालीं दूर गेली ॥
मुखीं असावें एक नाम । याहून दुजें पुण्य नसे जाण ॥
नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावे सत्य ।
हा निश्चय ठेवावा मनांत । मन होईल निभ्रांत ॥
कर्तव्यीं असावे तत्पर । मुखी नाम निरंतर ॥
नामाचें प्रेम करावें जतन । जैसा कृपण राखी धन । कारण नामच आपल्याला तारण ॥
मुखीं रामाचें नाम । बाह्य प्रपंचाचें काम ।
ऐसा राम जोडा मनीं । दुःखाचा लेश न आणावा मनीं ॥
आजवर राहिला वासनेचा आधार । अतां नामावर प्रेम ठेवा पुरेपूर ॥
असती पुण्याच्या गांठी । तरच नाम येईल कंठी ॥
रामाचें नांव ज्याला न होईल सहन । त्याची गति नाही उत्तम जाण ॥
निर्हेतुक घ्यावें नाम । जेणें जोडेल आत्माराम ॥
नामाविण जें जें साधन । तें तें कष्टास मात्र कारण ॥
देह जरी नाशवंत । सांगितलेलें नाम आहे सत्य ॥
बुद्धि करावी स्थिर । नामीं असावें प्रेम अनिवार ॥
नामांत कसलेही विचार आले । तरी ते नामानें दूर सारावे भले ॥
नामस्मरणीं निदिध्यास । स्थूलाची न करावी आस ॥
अखंड राखावें समाधान । हीच परमार्थाची खरी खूण जाण ॥
जगन्नियंत्या प्रभूस करावें आपलें ।
बाकी कितीजण आले गेले ।
मनावर त्याचा होऊं न द्यावा परिणाम ॥
परमार्थाला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥

३५५. देह सोपवावा प्रारब्धावर । मन गुंतवावे रामावर ॥

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 19, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ डिसेंबर २०१४

वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे.



भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचे मन अशा एका अवस्थेमध्ये राहते की, त्या ठिकाणी परमात्माच सर्व काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते. भगवंताशी एकरूप होऊन जाण्याचीच ती अवस्था आहे. ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने, 'मी करतो, मी बोलतो, मी काव्य करतो,' ही भावनाच त्यांना नसून, 'परमात्मा करतो, परमात्मा बोलतो, परमात्मा मंत्र रचतो' असा स्पष्ट आणि खरा अनुभव त्यांना येतो. या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नव्हेत. वेद हे खरे अपौरुषेयच आहेत. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदांतात इतर शास्त्रे येतात. वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानाप्रमाणे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून फारसा फायदा होत नाही. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. खरे म्हणजे विद्वान लोक हा वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवितात. मग सामान्य माणसाला वाटते की, 'अरे, हा वेदांत आपल्यासाठी नाही !' वास्तविक, वेदांत हा सर्वांसाठी आहे. मनुष्यमात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निःस्वार्थी बनणे, हेच खर्‍या वेदांताचे मर्म आहे.
भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यांमध्ये फरक आहे. मनामध्ये वासना उत्पन्न झाली असतां ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे, हा व्यवहार होय. सूक्ष्म वासना देहाच्या सहाय्याने जड बनणे हे व्यवहाराचे स्वरूप आहे. याच्या उलट, भगवंत अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे, त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे आहे. तेव्हां भगवंताचे साधन हेही जडापासून सूक्ष्माकडे पोचविणारे असले पाहिजे. जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते एक नामच होय. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला. पुष्कळ वेळा, चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात. मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्म घेतात. तिथे त्यांची वासना तृप्त व्हायला वेळ लागत नाही; म्हणून ते लहानपणीच जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचे दुःख करणे बरोबर नाही. वासना ही दुसर्‍या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. वासना नष्ट झाली की बुद्धी भगवत्स्वरूपच होईल. जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली.


३५४. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी 'हरिः ॐ' असते , ते नामच आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 18, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ डिसेंबर २०१४

काळजी करायची तर नामाची करा. 

 


आपण असे पाहतो की आज जे दुःखाचे वाटते तेच पुढे सुखाचे होते, आणि जे सुखाचे आहे असे वाटते तेच पुढे दुःखाला कारणीभूत होते. तुम्हांला जे सुखदुःख येते ते भगवंतापासून येते म्हटले, तर दुःखाचे कारण काय ? जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेंच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही. आपण घाबरतो केव्हां, तर आपला आधार सुटला म्हणजे, जे जे होते ते रामाच्या इच्छेने होते असे समजावे. संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचे होऊन असे भ्यावे का ? समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू. प्रत्यक्ष संकटाचे निवारण जर करता येते, तर मग भिती कशाची धरावी ? मुळात जी भिती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता याला काय म्हणावे ? खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचे सुख-दुःख कोणी करतो का ? तसे व्यवहारात आपण वागावे. सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये. असे व्हायला आपले मन शांत राहणे जरूर असते. जोपर्यंत 'मी कर्ता आहे' अशी भावना असते, तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात. म्हणून कर्तेपण रामाकडे द्यावे, आणि देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावे. 'परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा' असे म्हणावे, 'परिस्थितीच बदल' असे देवाला म्हणू नये.
ज्याप्रमाणे एखादे विष रक्तात मिसळावे, त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली आहे. त्याला वरून औषध लावले तर उपयोग होत नाही. ह्यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शनच पाहिजे. जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात, त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय. काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही. त्याचप्रमाणे, ज्याला काळजी फार, त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही. या काळजीचे आईबाप तरी कोण ? देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असे विचित्र असायचेच ! भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो; वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात. खरे म्हणजे, एकच स्थिती कधी कायम राहात नाही म्हणून आपल्याला भिती वाटते, आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. काळजी जितकी आपल्याला मारते, तितकेच नाम आपल्याला तारते. तरीसुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो, याला काय म्हणावे ? आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असे समजावे. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसे टिकेल याची करा.


३५३. नामाची काळजी घ्या, म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 17, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ डिसेंबर २०१४

सर्व दुःखांचे मूळ देहबुद्धी आहे.



परमार्थाचा विषय तसा खरोखरच कठीण आहे, आणि सर्वांना नडणारा आहे. ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल त्याला, मी कोण हे जाणण्यापेक्षा, मी कोण नव्हे हे जाणणे महत्त्वाचे आहे. एखाद्या पाऊलवाटेने जात असताना ती वाट चुकलो आणि आपण भलत्या मार्गाला लागलो तर त्यापुढला सर्व व्यवहार चुकत जाणार. एखादे गणित सोडविताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्यापुढले सर्व गणित चुकत जाते किंवा, एखाद्या रोगाचे निदान बरोबर झाले नाही तर मग त्या रोगावर केलेली औषधयोजना फुकट जाते, त्याप्रमाणे, मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्मांचे आकलन जर बरोबर झाले नाही, तर या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्गही जाणणे फार कठीण गोष्ट होईल. आपण आनंदी असावे, नेहमी आनंदात रहावे, असे सर्वांनाच वाटते; हा झाला पहिला गुणधर्म. या आनंदात चिरंतन असावे, निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन रहावे, असेही आपल्याला वाटते. खरे म्हणजे मरण कुणालाच आवडत नाही; जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्या सर्वांनाच असते. परमेश्वर आनंदरूप आहे, तो चिरंतन आहे. आपल्या ठिकाणी तो अंशरूपाने असल्यामुळे आपल्यालाही तसे राहणे साहजिकच आवडते. पण आपली मुळात वाट चुकली, आणि म्हणून त्यापुढले सर्व व्यवहारही चुकत गेले. एखाद्याच्या परसातले झाड पडल्यावर तो 'माझे झाड पडले' असे म्हणतो, परंतु त्याचा देह पडल्यावर 'त्याचे शरीर पडले' असे नाही आपण म्हणत, 'तो मेला' असे म्हणतो. म्हणजेच मुळात चूक ही की, आपण स्वतःला देह समजूनच राहतो. देह माझाच समजून त्याच्यावर प्रेम करतो, ही आपली पहिली चूक. नंतर, या देहाचा गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर, त्यांचीच जोपासना करतो, ही दुसरी चूक. एकदा हे विकार चिकटल्यावर, त्यांची वाढ न थांबविता, ते नेतील तिकडे त्यांच्या पाठीमागे जाणे, आणि त्याकरिता वेळप्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणे, ही तिसरी चूक. अशा रीतीने चुकांनी चुका वाढत जाऊन आयुष्याचे गणित मग साफ चुकते.
एखादे झाड तोडायचे असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात, आणि नंतर बुंधा तोडतात; तसे, नीतिधर्माने वागणे म्हणजे देहाला लागलेल्या विचाराच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे, दुसरी योजना म्हणजे सगुणभक्तीची. सगुणभक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो, आणि 'मी तुझा आहे' असे म्हणतो. या भगवंताचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर त्याच्या नामानेच. या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल. पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. तेव्हा आत्तापासून, मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा. मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करील.


३५२. मी कोणीच नाही, सर्व राम आहे, आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदात रहा.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ डिसेंबर २०१४

नाम हेच परमेश्वराची भेट करवून देईल. 

 



गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एकएक थेंब स्वच्छ पाणी तेथून खाली पडत असलेले आपल्याला दिसेल. पूर्वपुण्याईमुळे आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो. पुढे त्या स्वच्छ झर्‍याचे नदीत रूपांतर होते, आणि अनेक ठिकाणांहून वाहात आल्याने पुढे गढूळ बनते. तसेच आपले जीवनही व्यवहारांतल्या बर्‍यावाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळे पुढे गढूळ बनत जाते. परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ तळाशी राहतो, त्याप्रमाणे कोणतेही काम करताना नाम घेतले तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून, वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो. कोणीही दाढीवाला साधू येऊन सांगू लागला की परमार्थ असा आहे, तसा आहे, तर तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून सांगा कीं, नामाशिवाय परमार्थच नाही. कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणे हाच खरा परमार्थ.
भगवंताचे प्रेम यायला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला, नामासारखे साधन नाही. आपलेपणाचे प्रेम किती असते पहा ! एक मुलगा आईजवळ राहात होता. पुढे त्याचे लग्न झाले. त्याने बायको आपली मानली, तिच्याबद्दल त्याला प्रेम उत्पन्न झाले. पुढे ती जरा कृश झाली. त्याला वाटले, ही शहाणी आहे, बोलत नाही, परंतु हिला आपल्या आईचा जाच असला पाहिजे. म्हणून तो वेगळा निघाला. आपले म्हटल्याने केवढे प्रेम उत्पन्न होते पहा ! तेव्हां, परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगाने त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केला पाहिजे. रामाचे प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीनेच येऊ शकेल. नुसते पुस्तक वाचून परमार्थ सांगणारे भेटतील, पण आचरणात आणून सांगणारे विरळाच. किती, किती म्हणून प्रपंच केला तरी अपुराच पडतो. एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरे पाहू जाता सर्व झालेला असतो. मुलेबाळे असतात, सर्व तर्‍हेने तो सुखी असतो. परंतु मरणसमयी म्हणतो, नातवाची मुंज पाहिली असती तर बरे झाले असते ! माणूस वासनेत कसा गुंतलेला असतो ते यावरून कळेल. संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही, तो अपूर्णच राहतो. मनुष्याच्या जीवनाची तळमळ परमेश्वर प्राप्तीशिवाय शमूच शकत नाही. त्याच्या जीवाला समाधान एका परमेश्वर भेटीतच मिळू शकते; आणि याकरिता आयुष्याच्या सुरुवातीपासूनच नामाची कास धरा. हेच नाम मृत्युसमयी तुम्हाला परमेश्वराची भेट करवून देईल याची पूर्ण खात्री बाळगा. अत्यंत गुह्यातले गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो, नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय.



३५१. आपण मागितलेले भगवंत पुरवू लागला, तर त्याला आपल्यासाठी
चोवीस तास राबावे लागेल. आणि इतके करून आपले अपुरेच राहील.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ डिसेंबर २०१४

नामस्मरणात राहणारालाच खरे दर्शन होते. 

  


श्रीकृष्ण परमात्म्यांनासुद्धा देह ठेवावा लागलाच ना ? निराकार असले, तरी साकार झाल्यावर त्याला सर्व काही आलेच की ! रूप आले, गुण आले, सर्व काही आले, आणि मग व्यवहारामध्ये सर्व करणे आले. तसेच ते साकारात आले म्हणून त्यांना जाणे हेही आलेच. श्रीकृष्ण व्यवहाराप्रमाणे वागले. वास्तविक पाहता, ते आलेही नाहीत आणि गेलेही नाहीत. त्यांना येणे जाणे नाहीच; ते कायमच आहेत. साकाराचे रूप पहावेसे वाटते, पण तेच सर्व काही नव्हे हे समजून चालले पाहिजे. भगवंताला पहायचे असेल तर त्याला देहात पाहून चालणार नाही, असे श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितले, आणि त्याला ज्ञानाने समजावले. उद्धवाला हे ज्ञान झाल्यावर, त्यांनी त्याला "आता जाऊन गोपींचे समाधान कर" असे सांगितले. त्याप्रमाणे गोकुळात जाऊन तो गोपींना सांगू लागला की, " तुम्ही श्रीकृष्णाला देहात पाहून प्रेम केले, हे योग्य झाले नाही, तुमची चूक झाली." अशा रीतीने, देहाबद्दल त्याने तिरस्कार उत्पन्न करण्याचा प्रयत्‍न केला. त्यावर गोपींनी त्याला म्हटले की, " तू आपला वेदांत जिथे कुणी नाही तिथे जाऊन सांग; श्रीकृष्णाला देहात पाहून आम्हाला जे मिळाले ते आमचे आम्हालाच ठाऊक. ते तुला मिळणे शक्य नाही." गोपींनी श्रीकृष्णावर जे प्रेम केले ते देहाला विसरून केले, त्याच्यापुढे त्यांनी सर्वस्व तुच्छ मानले; आणि त्यामुळेच श्रीकृष्णालाही गोपींवर तसेच प्रेम करणे भाग पडले. गोपी त्याला अनन्यशरण होऊन राहिल्या. तसे प्रेम करावे.
जो नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरे दर्शन होते' आणि ते रोज सतेज होत असते. देहाचे दर्शन हे विसरणारे असते. म्हणून नाम घेत राहा, म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुणमूर्ति नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नसते. पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण नाम घेतल्यावर, भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही. सद्‌बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेले तरी नाम शिल्लक राहते. म्हणूनच राम, कृष्ण, इत्यादि सर्वजण शेवटी नाहीसे होऊन, केवळ नाम तेवढे शिल्लक राहिले. नाम हे स्थिर आहे, रूप हे सारखे बदलणारे आहे. कलियुगात सगुण अवतार नसला तरी 'नामावतार' आहे, आणि तोच खरा तारक आहे. नामाकरिता नाम घ्या कीं त्यात राम आहे हे कळेल.


३५०. भगवंताजवळ काय मागावे ? 'तुझे प्रेम मला लागू दे.' हेच त्याच्याजवळ मागावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 14, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ डिसेंबर २०१४

नाम घेताना मनात एक परमेश्वरच पाहिजे. 

 



खरोखर, भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते प्रेम आतून यायला पाहिजे. परंतु परमेश्वराबद्दल खरे प्रेम उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे. परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही आपल्याला. मग ती ऐकू कशी जाणार ? सहवासाने प्रेम वाढते. आगगाडीच्या चार तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होते, तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होत नाही ? देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी येते. नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा, म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ति कमी होऊन नामावर प्रेम जडते. बायकामुलांच्या प्रेमाकरिता आपण केवढा त्याग करतो ! मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरिता क्षुद्र वासनांचा त्याग आपण का करू नये ? नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे; दुसरी कोणतीच वृत्ति उठता कामा नये; तेच खरे नामस्मरण. विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत. ते भगवंतानेच दिले आहेत, म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना, व्यवहारामध्ये विकारांची जरूरी आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे, विकारांनी आपल्यावर सत्ता गाजविता कामा नये.
समजा, राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे मिसळले आहेत; ते वेगळे करायचे असतील तर त्यांतले एक काढले की दुसरे आपोआप शिल्लक राहते. शिवाय, त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपे आहे ते आपण काढतो. त्याप्रमाणे, घ्यायला सोपे असलेले भगवंताचे नाम आपण घेत गेल्याने विषय आपोआप बाजूला पडेल. दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो. त्याप्रमाणे, भगवंताचे अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच. पण तो हवेपणाने भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही. सर्व संतांचे सांगणे एकच आहे आणि ते असे की, "तू भगवंताचे अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव, त्याने तुला सत्याचे ज्ञान होईल." भगवंताचे अनुसंधान याचा अर्थ असा की, बाकीच्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष झाले तरी चालेल, पण परमात्म्याचे विस्मरण होता कामा नये. भगवंताचे अनुसंधान कोण कसे ठेवील याचा नेम नाही. कोणी पूजा करुन ते ठेवील, तर कोणी भजन करून ते ठेवील, कोणी नामस्मरण करून ठेवील, कोणी मानसपूजा करून ठेवील, तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवील. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय ठेवावे, आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करू या. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचे सार आहे.



३४९. अखंड मुखी रामनाम, आत असावे अनुसंधान, हाच सगळा परमार्थ जाण.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 13, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ डिसेंबर २०१४

भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते. 

 



देह म्हटला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत. पण समजा, देहाचे इतर अवयव शाबूत आहेत, आणि हृदय तेवढे बंद पडले, तर सर्व इंद्रिये शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही. या‍उलट हृदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले, तरी उपचार करून पुनः पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो. फार काय,पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी, हृदय शाबूत असेल तर काम भागते. पण जर का हृदयच बंद पडले, तर मात्र सर्व कांही संपलेच. नाम हे हृदयासारखे आहे. इतर साधने ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत. म्हणून नाम नसेल तर इतर साधने फलदायी होऊ शकणार नाहीत. 'आता या जन्मात एवढे पुरे' हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता, पण पैसे मिळविण्यासाठी किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करीत नाही ! याचे कारण, भगवंताचे स्मरण केले नाही तरी चालते असे वाटते. प्रपंचात जिला प्रीती असे म्हणतात ती भगवंताकडे लागली की भक्ति बनते; प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते. अशा रीतीने आपले विकार भगवंताकडे लावता येतात.
एक प्रवासी होता. गाडीमध्ये त्याला चांगली जागा मिळाली म्हणून आपल्या स्टेशनावर न उतरता, गाडी शेवटी थांबते तिथपर्यंत तो गेला; आणि त्याच गाडीने तो पुनः परत आपल्या गावी आला ! त्याचप्रमाणे आपला जन्म-मरणाचा प्रवास चालला आहे. तुम्ही त्या प्रवाश्याप्रमाणे परत येऊ नका. प्रवासामध्ये केळी, संत्री वगैरे घ्या, म्हणजे इथे घरेबिरे बांधा, पण आपले स्टेशन विसरू नका. भगवंत हे आपले स्टेशन आहे. अलिकडे शास्त्री पंडित सुद्धा सर्वजण भगवंताच्या उलट बोलू लागले आहेत. म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा, आणि नंतर पोथी पुराणे ऐकावीत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी, किंवा करमत नाही म्हणून, किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात; असे करणे योग्य नाही. पोथ्या-पुराणांच्यामध्ये दोष नाही; पण सांगणारा आपले काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरते. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान, हेच सर्व पोथ्यांचे सार आहे.
आपण जसे करतो तसे बोलण्यासाठी, आपण आपले बोलणे कमी केले पाहिजे. बोलणे कमी करायला मन गुंतवून ठेवणे जरूर आहे. भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते. ह्या भावनेचे मूळ प्रत्येकाच्या हृदयात असते. हीच शुद्ध भावना आपल्याला तारते, मंदिर आणि समाधी तारीत नाही. देहाच्या सहवासाने जशी देहाशी एकरूपता झाली, त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता त्याचे स्मरण सारखे ठेवले तर त्याच्याशी एकरूपता का होणार नाही ?

३४८. परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 12, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ डिसेंबर २०१४

योगाने जे साधते ते नामाने साधते.

    


गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की, जो कोणी काही मागायला येईल त्याला 'नाही' म्हणू नये; आपल्याजवळ जे असेल त्यामधले थोडे तरी त्याला द्यावे. अन्न द्यायला कधीही मागेपुढे पाहू नये. पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून, आणि त्याचा हेतु पाहून, तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे; पण 'नाही' म्हणणे चांगले नाही. भिकार्‍याला कधीही वेडेवाकडे बोलू नये. आपली नोकरी हीही एक प्रकारची भीकच आहे ! भिक्षा मागणे हे वैराग्याला कमीपणाचे नाही, पण भिक्षा ही स्वार्थासाठी नसावी. आपले पोट भरल्यावर राहिलेल्या अन्नाचा प्रत्येक कण दुसर्‍याला द्यावा. वैराग्याचे तेज कधी लपून राहात नाही. अत्तरे लावून तेज आणणे निराळे, आणि वैराग्याचे तेज निराळे. वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे.
जगाचा स्वभाव कळणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. जे खोटे आहे ते खरे मानणे, हे अज्ञान, अविद्या होय. खरोखर, मनुष्याची पारमार्थिक योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणे शक्य नसते. साधूंनाच अंतरंग समजते. म्हणून, तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कुणालाही नावे ठेवू नयेत. अंतकाळी मनुष्य मनाच्या कशा अवस्थेत जातो, यावरून पारमार्थिक अवस्थेची कल्पना येऊ शकते. साधा मनुष्यसुद्धा नामाच्या योगाने मोठ्या योग्यतेला चढतो. अर्थात् ते कळायला आपण स्वतः नामामध्ये मुरले पाहिजे. नामामध्ये फार सामर्थ्य आहे; कुणी त्याचा अनुभव घेऊन पाहात नाही, त्याला काय करावे ? योगाने जे साधते ते नामाने साधते यात संशय नाही. ज्याला नामाची चटक लागली, त्याच्यावर रामाने कृपा केली असे निश्चित समजावे. परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणे हाच उपाय आहे. तसे पाहिले तर प्रपंची माणसे अत्यंत स्वार्थी असल्याचे दिसून येते. त्यांचा स्वार्थ यत्किंचित् न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो. हे कसे शक्य आहे ? अत्यंत निःस्वार्थी बनणे याचेच नाव परमार्थ. तो साधण्यासाठी थोडातरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावे. साधुसंतांच्याकडे जाऊन हेच शिकायचे असते. प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कुणीच सांगत नाही, आणि असे सांगितले तरी कुणी ऐकत नाही. पण निदान प्रपंच, म्हणजे आपला स्वार्थीपणा, हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात, ते काही गैर नाही. स्वार्थ कमी व्हायला वासना कमी झाली पाहिजे; वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे; भगवंताची कास धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे; आणि त्याचे अनुसंधान टिकविण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे. म्हणून तुम्ही नाम घेत जावे.


३४७ ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडले.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 11, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ डिसेंबर २०१४

कर्ममार्गाने जात असता नामाची अत्यंत गरज आहे.




परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. जो पंत असेल तोच संत बनेल. प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे. खरोखर, भगवंताला 'सर्व' देण्यापेक्षा 'स्व' द्यायला शिका. 'स्व' दिल्यावर 'सर्व' न दिले तरी चालेल, कारण ते आपले - आपल्या मालकीचे राहातच नाही. उलट 'सर्व' देऊन 'स्व' द्यायचा राहिला, तर 'सर्व' दिल्याचे समाधान मिळत नाही. भगवंताला 'स्व' देणे म्हणजे 'मी त्याचा आहे' ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय.
वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते. परंतु ज्या भगवंताची प्राप्ति व्हावी म्हणून करावयाची, त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मात नसेल, तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणामध्ये होते. शिवाय, सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्याकारणाने, वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाहीत. म्हणून, आपण कर्ममार्गाने जात असता, कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे. कर्ममार्ग मनापासून करणार्‍या माणसामध्ये, नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते, त्याबद्दल माझा आक्षेप आहे. ए‍र्‍हवी, कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल आदरच आहे.
एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने माफ होतात हा समज खरा नाही. परंतु, कर्माने चित्त शुद्ध होत असताना नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते. इतकेच नव्हे, तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहते, आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते. रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे, तर तो सिद्धमंत्र आहे. तो भगवंतापर्यंत नेतो; नव्हे, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पाहावे. रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नि आहे. रामनाम हा ॐकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. श्रीशंकरांपासून तो श्रीसमर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले. रामनामाचा साडेतीन कोटी जप करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा. नाम घेत असता, जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे, असा भरवसा ठेवावा.

३४६. नामाकरिता नाम घ्या, की त्यात राम आहे हे नक्की कळेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 10, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० डिसेंबर २०१४

राम ठेवील त्यांत समाधान राखावें । 

 



प्रपंची राहून समाधान । हेंच मोठें ज्ञानाचें ज्ञान ॥
भगवंताचे हात जेथे । समाधान सुख राहते तेथें ॥
राम ठेवील त्यांत समाधान राखावें । हाच सुखी होण्याचा मार्ग जाण ॥
रामापायीं अनन्य झाला । समाधान चालत येईल घराला ॥
ज्याचे अंतःकरणांत समाधान । तेथें भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ति जाण ॥
आपलें असमाधान होण्याचें कारण । रामाहून दुसर्‍याचें झालो आपण ॥
उपाधिरहित रामास पाहावें । मध्यंतरीं चित्त कोठें न गुंतवावें ॥
चित्त गुंततां मध्यस्थळीं । परमात्म्याची प्राप्ति दुरावली ॥
भगवंताचे स्मरण । तसेंच भगवंताचे आगमन । पुण्याशिवाय घडत नाही जाण ॥
श्रीराम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास । समाधान राखावें खास ॥
दाता एक रघुनंदन । हा भाव ठेवावा मनांत । त्यास दैन्यपण न येईल जगांत ॥
धर्माचें रक्षण । ठेवतां परमात्म्याचें स्मरण ॥
राम आपल्या दासावरी । नित्य कृपा करी ॥

राम परमात्मा कृपा करतो । सर्व चुकीची क्षमा करतो ॥
पुन्हा वाईट न वागावें । याबद्दल जबाबदारीनें वर्तावें ॥
'अंतीं घेतां माझें स्मरण । मी उद्धरीन त्यास आपण' ।
हे खुद्द भगवंताचे वचन । तेथें नसावें शंकेचें कारण ॥
रघुनाथावांचून सुखी झाला । असा नाहीं कोणी पाहिला, ऐकिला ॥
मीपणाचा सोडावा अभिमान । तोच एक भगवंताचा जाण ॥
राजाची भेट झाली । खालच्यांचे नाहीं महत्त्व तेथें । तैसें जगन्नियंत्या प्रभूस करावें आपलें ॥
आजवर रामानें सांभाळ केला । तो आजही नाहीं निजलेला ॥
पण त्याची जागृति । असे आमचें हातीं ॥
काळावर ज्याची सत्ता । त्याचे चरणीं ठेवावा माथा । मग धोका नाहीं ही मानावी सत्यता ॥
राम ज्याच्या हृदयीं करी वास । तेथें ऋद्धिसिद्धि पडल्या ओस ॥
निःस्वार्थापाशीं भगवंत । हा जाणावा सिद्धांत ॥
राम कर्ता हा ठेवावा भाव । कमीपणाला नाहीं ठाव ॥
कर्तव्य करावें निःस्वार्थबुद्धीनें । राम खूष होईल त्यानें ॥
ज्याला नाहीं दुसरा उपाय । तेथें मागावें भगवंताचें साहाय्य ॥
परमात्मा ज्याचा साह्यकारी । त्यास धोका नाहीं तिळभरी ॥
देह आहे परतंत्र । मन राखावें भगवंताशीं स्वतंत्र ॥
विषयविरहित मारावी हांक । तुमचे समोर माझा दाशरथि राम ॥
रामानें करावें सर्वांचे कल्याण । दुष्टास सुबुद्धि देऊन जाण ॥
दीनदयाळु परमात्मा राम खास । न ठाव द्यावा विकल्पास ॥
त्याच्याशीं वागावें सत्य । कृपा करील भगवंत ॥
अखंड करा नामस्मरण । जेणें कृपा करील रघुनंदन ॥

३४५. भगवंतानें काय दिलें तें पहावें । त्यांत समाधान राखावें ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 9, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ डिसेंबर २०१४

अभिमान बाळगू नये, निंदा करू नये.

 

   

खरे पाहिले असता, देहबुद्धीचा जोर व्हायला कारण म्हणजे आमचा अभिमान होय. अभिमानाने सद्‌गुण जाऊ लागले तर काय उपयोग ? ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे, ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात. अभिमानासारखा मोठा शत्रू नाही. अंतरंगातल्या या शत्रूचा आपण शोध घ्यावा आणि त्याचा योग्य बंदोबस्त करावा. नुसत्या सत्कर्माने अभिमान जात नसतो. सापाला दूध घातले तरी त्याचे विषच होते, तसे अभिमानाला कोणतेही कृत्य घाला तो वाढतच जातो. आता याकरिता सत्कर्मे करायचे सोडावे असे नाही, परंतु अभिमान न बाळगता ती करावीत. 'मी कर्ता' ही भावना सोडावी. अभिमान हा बारशाला आपल्याबरोबर येतो, आणि बाराव्यापर्यंत आपल्याजवळच राहण्याचा प्रयत्‍न करतो. म्हणून नामरूपी अंकुशाच्या योगाने त्याला वेळीच हुसकून लावणे आवश्यक आहे.
आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे; म्हणजे आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे. समजा वरचे खारट पाणी काढून टाकले आणि जास्त खोल खणले, तर एखादे वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव असतो. मग त्या विहिरीचे पाणी गोड होईल. तसे, आपण जर अभिमान टाकला, निंदा बंद केली, आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधला, तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपले अंतःकरण त्या प्रेमाने भरून जाईल. आपल्याकडे अशी म्हण आहे की, जे आडात आहे तेच पोहऱ्यात येते. विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहऱ्यामध्ये येणार हे जसे खरे, त्याचप्रमाणे आपल्या मनात जे असते तेच बोलण्याच्या रूपाने बाहेर पडते. बोलण्यावरून माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होते. ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे. काही लोक दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे त्याची निंदा करतात; दुसऱ्याचे चांगले त्यांना पाहवत नाही. काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसऱ्यांची निंदा करतात. काही लोकांची दृष्टीच अशी वाईट असते की, दुसऱ्यामध्ये दोष असो वा नसो, त्यांना दुसऱ्यांत दोष दिसायचाच.
भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने, दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे. त्याने दुसऱ्याची निंदा करू नये, आणि आपल्या सामर्थ्याचा वा गुणाचा अभिमानही बाळगू नये. लोकांनी जे करू नये असे आपल्याला वाटते, ते आपण स्वतः करू नये. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा; त्याचा वास आत नसावा. आत वास भगवंताचाच असावा. त्यामुळे आतल्या सर्व दोषांचे उच्चाटन होऊन मनाला शाश्वत शांतीचा आस्वाद घेता येईल.

३४४. दोष सांगणे आणि बोलणे हे हीनपणाचे लक्षण आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 8, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ डिसेंबर २०१४

देहाला भगवंतप्राप्ति करिताच सांभाळावे. 

 



देहाला सांभाळणे जरूर आहे; परंतु भगवंतप्राप्ति करिता ते करावे, विषयासाठी नाही करू. बाहेरचा लौकिक सांभाळला पण होते नव्हते ते घालविले, यात काय मिळविले ? हा वेडेपणा म्हणायचा. आतल्या खोबर्‍याचे रक्षण करण्याकरिता करवंटीची जरूरी आहे. केवळ बाह्यांगाचीच जपणूक करणे हेच काही मनुष्याचे अंतिम उद्दिष्ट नाही. बाह्यांगाचे सुख हे काही खरे नाही. 'मी, माझे' यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो, कल्पनेने जेवढे समजेल तेवढे पाहू लागतो; परंतु शेवटपर्यंत 'मी कोण' याचा आपल्याला पत्ता लागत नाही. आपली चूक झाली असे समजले म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पहावा. जिथून आपली वाट चुकली तिथे परत यावे लागते. 'मी देही' असे म्हणू लागलो, इथे वाट चुकली. असत्याला सत्य मानले ही आपली चूक झाली. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली, त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला, तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही, हे मात्र और आहे. खरोखर, प्रपंच हा टिपर्‍यांच्या खेळाप्रमाणे आहे. टिपर्‍यांच्या खेळात एकाला टिपरी दिली की, तो लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो, त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे. आपले जन्म आणि मरण एक प्रकारे रोज घडत असते. आपण निजलो, झोपी गेलो, की मरण समजावे; आणि उठलो, जागे झालो की आपला जन्म झाला असे समजावे.
एखाद्या तुरुंगात पुष्कळ कैदी असतात; कुणी काही, कुणी काही केलेले असते, हे खरे; तरी जे करू नये ते प्रत्येकाने केलेलेच असते ही गोष्ट निश्चितच आहे. त्याप्रमाणे, जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी, जे करू नये ते त्यांनी केले आहे, ही गोष्ट निश्चित. परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे, ती ही की, जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे. म्हणून त्याबद्दल फार विचार न करता जगातले दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्‍न करावा. ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्यालाच जगाचा, दुःखाचा विसर पडतो, जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ति होते. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे. जेवढ्या उत्कटतेने नाम घेऊ तितके अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ; मग देहाची आठवण कशाला राहील ? आपण नाम घ्यावे तें आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावे हाच आनंदाचा मार्ग आहे.


३४३. नाम अंतरात शिरले की देहाचा विसर पडतो. मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 7, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ डिसेंबर २०१४


श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ डिसेंबर २०१४

नाम आणि प्रेम ही जुळी भावंडे आहेत.

    


साधारण प्रापंचिकाची ओढ विषयाकडे असते. आज सुख कशात आहे एवढेच तो बघतो, आणि विषयात तो इतका तल्लीन होतो की जगालाही तो तुच्छ मानतो. विषय शेवटी दुःखालाच कारणीभूत होतात हे तो विसरतो. विषय आणि मी एक होतो तेव्हा सुख होतेसे वाटते. पण वास्तविक, आजवर कुणालाही विषयाने शाश्वत सुख आणि समाधान मिळालेले नाही. असे सुख आणि समाधान मिळविण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणे हा एकच उपाय आहे. वृत्ती नेहमी एकाकार व्हावी, पण ती विषयात न होता नामात व्हावी, हेच सर्व संतांचे सांगणे आहे. 'मना'ला उलटे केले की 'नाम' हा शब्द तयार होतो. याचा अर्थ असा की, नाम घेणे म्हणजे मनाची विषयाकडे असलेली ओढ उलटी फिरविणे. नाम म्हणजेच 'न मम'. प्रपंच माझा नाही म्हणून करणे म्हणजेच नाम घेणे. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का, याचा प्रत्येकाने विचार करावा. प्रपंचातले आपले कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर, जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानाने राहून नामस्मरणात काळ घालवावा.
निर्गुणाला एक जुळे झाले, ते म्हणजे नाम आणि प्रेम. दोन्ही एकमेकांना अतिशय चिकटून आहेत. एकाला धरले की दुसरे त्याच्यामागे येते. आज आपले प्रेम अनेक वस्तूंवर, व्यक्तींवर, पैशावर, विद्येवर, देहावर, लौकिकावर गुंतले आहे. त्या कारणाने, भगवंतावर प्रेम करून त्याच्यामागे नाम येईल अशी आपली अवस्था नाही. गोपींची तशी अवस्था होती. पण आपण नामाला वश करून घेऊ शकतो. ते झाले की भगवंताचे प्रेम आपोआप येईल. घरादारावर प्रेम सहवासाने बसते; मग नामाचा सहवास केला तर प्रेम का लागणार नाही ?
खरोखर, या जगात कुणाच्या बुद्धीला पचविता आल्या नाहीत अशा कितीतरी वस्तू आहेत. मुलाला आपल्या बापाचे बारसे पाहाणे जसे शक्य नाही, तसे 'मी कोण आहे "' हे बुद्धीने ओळखणे शक्य नाही. खरी सत्य वस्तू कल्पना, बुद्धी, आणि तर्क यांच्या पलीकडे आहे. सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्याने झाकले आहे ती वस्तू दूर करा, म्हणजे सत्य दिसेल. सत्य हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही; पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते. उदाहरणार्थ, भिती, कल्पना इत्यादि आपणच उत्पन्न करतो. नदीच्या पुलावर उभे राहिले असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता देखील, वाहणार्‍या पाण्याची मजा अनुभवता येते; त्याचप्रमाणे भगवंताचे सत्यत्व ज्याच्या अंतःकरणाला पटले, तो विषयामध्ये राहून देखील, होणार्‍या सुखदुःखाच्या गोष्टींकडे गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वतः अलिप्त राहील.

३४२. सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे. आत्मा सुख-रूप आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 6, 2014

दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा


श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ डिसेंबर २०१४

निरासक्ति आणि शरणागति 

 



एखाद्याची सुरी असली, तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची केली; दुसर्‍याने चांदीची केली, कुणी सोन्याची केली; पण मारल्यानंतर परिणाम एकच ! तसा, प्रपंच चांगला असला, कसाही असला, तरी तो सुरीच आहे, त्याचा घात सगळीकडे सारखाच ! प्रपंचाची आसक्ति म्हणजे सुरीची धार आहे. म्हणून, आपला धंदा, नोकरी, सगळे उत्तम करावे,त्यात मागेपुढे पाहू नये; पण त्यासाठी मी आहे असे नाही समजू कधी. नोकरी ही सुखाकरिता नसून पोट भरण्यासाठी आहे अशा वृत्तीने जो ती करील त्याला तिची आसक्ति आणि अभिमान राहणार नाही. सावधगिरीने वागावे, भगवंताचे स्मरण ठेवावे, त्याचे नाम घ्यावे; बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्या. यानेच समाधान मिळेल. भगवंताशिवाय समाधान मिळणे शक्य नाही. 'मी समाधान राखून चाललो' असे म्हणणारा, तो जगात धन्य आहे खरा ! ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. रामाच्या इच्छेने सर्व चालले आहे, राम कर्ता आहे, ही भावना ठेवून आपण प्रपंच करू या. प्रयत्‍न आटोकाट करावा, पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून समाधान टिकवावे.
भगवंताची प्राप्ति व्हायला दुसरे काही नको, शरणागती पाहिजे. मी उपाधिरहित बनणे ही शरणागती आहे. माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसेच पाहिजे. इतके उपाधीरहित साधन नामाशिवाय दुसरे कोणतेही नाही. ते साधन तुम्ही करा. भगवंताच्या नामाचे प्रेम यायचे असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण द्वेषाने, मत्सराने, अभिमानाने भरलेले असू नये. एकमेकांवर प्रेम करा, घरातून सुरुवात करा. मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही, पण माझे कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीन. निःस्वार्थीपणाने प्रेम करणे हाच परमार्थ आहे खरा. त्यासाठी, राम दाता आहे, पाठीराखा भगवंत आहे, ही जाणीव ठेवून तुम्ही रहा. ही जाणीव निर्माण करण्याकरिता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे. मनाची शांति मिळवायला हाच मार्ग आहे. दैन्यवाणे कधीच नसावे. अगदी राजाचे वैभव तुम्ही भोगा, पण त्या वैभवाने मी सुखी आहे असे न म्हणता, मी रामाचा आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा. वैभव आज आहे, उद्या नाही; वैभवावर विश्वास ठेवू नका. मी रामाचा आहे या भावनेत तुम्ही रहा. त्यासाठी रामाचे नाम तुम्ही घ्या, राम कल्याण करील हा माझा भरवसा तुम्ही ठेवा.


३४१. सुख कशात आहे ? सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे होणे ही समजूत तेवढीच खरी आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

December 5, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ डिसेंबर २०१४

नाम सहजपणे येणे याचे नाव 'अजपाजप.' 

 



एक चांगला गृहस्थ होता. त्याला कसलेही व्यसन नव्हते. त्या गावात एक दिवस एक बुवा आला. या सद्‌गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कुणीतरी सांगितले की, हे आलेले बुवा भविष्य अति उत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा ओढीत होते. त्याला काही तो वास सहन झाला नाही. तरीही, भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपर्‍यात बसून राहिला. असे बरेच दिवस गेले. होता होता त्याला बुवा फार आवडू लागले. त्याप्रमाणे तो रोज तिथे जात असे. एक दिवस बुवांनी सांगितले म्हणून चिलमीत निखारा ठेवला; दुसरे दिवशी फडके ओले करून दिले. पुढे त्याला एकदा बुवांनी सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन पाहिला; आणि हळूहळू सवयीने तो इतका तरबेज झाला की त्याने गांजा ओढण्यात गुरूलाही मागे टाकले ! असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो. ज्याची संगत केली असता भगवत्प्रेम प्रकट होते, तो संत जाणावा. अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी.
श्रीरामप्रभूला आवडणारे 'नाम' घेऊन मारुतिरायांनी त्याला आपलासा करून घेतला. ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या, भगवंताला आपलासा करून घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे. नाम कुठेही घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेने घ्या, म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोहोचू शकेल. परमेश्वराच्या प्राप्तिसाठी प्राणायाम, योगासने इत्यादि साधने सांगितलेली आहेत. परंतु त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे परमेश्वराची सहजभक्ति. भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव 'अजपाजप' होय. हा भक्तिचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे. मीपणा जाणे हीच भगवंताची खरी अनन्यता होय. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताची एकरूपताच होय. परमार्थ म्हणजे आपली 'सहजावस्था' झाली पाहिजे; आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे. भगवंताच्या नसतेपणाने उठलेले वारे म्हणजे काळजी होय. मनुष्याच्या सर्व दुःखांवर, आजारांवर, आनंद आणि समाधान हेच खरे औषध आहे. जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो, त्याला हे औषध सहजी लाभत असते. या औषधाचा परिणाम नकळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आनंदमय राहण्याकरिता भगवंत हवा. भगवंताकडून येणारी शांति हेच समाधान होय. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. या नामात आपले सर्वस्व गुंतवले तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल.


३४०. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगालासुद्धा विसरेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या