October 30, 2015

संकष्टी चतुर्थी

श्री गणेशाय नम :! 
 आज संकष्टी चतुर्थी , 
आज पासून दर संकष्टीला गणपती संदर्भात / देवस्थान संदर्भात आणि इतर गणपती संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे . हा उपक्रम आपल्याला आवडल्यास अवश्य कळवा a.kelkar9@gmail.com 

 या लेखन मालेची सुरवात करताना आज आपण माहिती घेऊ पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपती - कसबा पेठ गणपतीची 

 कसबा गणपती हे अखिल पुण्यनगरीचे ग्रामदैवत. चारशेपेक्षा अधिक वर्षांपासुन अस्तित्वात असलेले ! कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दोन ग्रामदैवतं! मुळा, मुठेच्या संगमावर वसलेल्या पुण्यनगरीतील हे गणेश दैवत सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे, म्हणजे अगदी पुरातन असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. मंगलकार्य असो, लग्न , मुंज असो वा इतर कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, घरातील पहिली अक्षता जाते ती कसब्याच्या गणपतीला ! 
 हे जयति गजानाना, कार्य निर्विघ्नपणे सिद्धिस जाऊ दे ! अशी प्रार्थनाही केली जाते. मंदिरात गणेशजन्माचा उत्सव वर्षातून तीनदा साजरा करण्यात येतो. या गजाननाच्या पूजनाचे भाग्य अनेक पिढ्यांपासून ठकार घराण्याकडे वंशपरंपरेने चालत आलेले आहे. ठकार घराणे मूळचे विजापूरचे ! सुमारे चारशे वर्षांपूर्वी विजापूर जिल्ह्यातल्या इंडी तालुक्यातील आठ ब्राह्मण घराणी तत्कालीन राज्यकर्त्यांच्या जाचास कंटाळून, आपला मुलुख सोडुन निघाली. ठकार, ढेरे, उपाध्ये, धर्माधिकारी, कलंगे, निलंगे, वैद्य, , कानडे अशी ही आठ कुटुंबे ! ही देशस्थ ब्राह्म्ण मंडळी मार्गक्रमण करीत असताना त्यांना नगर जिल्ह्यात अडविण्यात आले. यातील ढेरे कुटुंबातील एका व्यक्तीला बाटविण्यात आले. त्यानंतर ही मंडळी मजल दर मजल करीत पुण्यात पोचली व नदीकाठी असलेल्या भागात स्थायिक झाली. हीच आजची कसबा पेठ ! यातील कलंगे आणि निलंगे सोडून बाकी सर्व सहा घरे आज शेजारी शेजारी आहेत. या प्रवासात ठकारांपैकी श्री. विनायकभट्ट ठकार य़ांच्याकडे त्यांच्या नित्यपूजेतील, गजाननाची मुर्ती होती. तांब्याच्या आकाराएवढी ही मूर्ती ! विनायकभट्टांनी आपल्याच घरात तिची प्रतिष्ठापना करुन तिचे नित्य पूजन सुरु केले. 

 आज अनेक वर्ष केलेल्या सततच्या शेंदुरलेपनामुळे मुळ मूर्ती झाकून गेली आहे. आता ती जवळपास तीन फुट लांब व साडेतीन फुट रुंद अशी दिसते.   कसब्यातील फणी आळीत मंदीराचे प्रवेशद्वार असून ते पूर्वाभिमुख आहे. श्री गजाननाची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूळ मूर्तीची स्थापना केलेला गाभारा दगडी आहे जो राजमाता जिजाऊसाहेबांनी बांधुन दिला आहे व आजही जसाच्या तसा आहे. असे म्हणतात की जेव्हा शिवाजीमहाराज औरंगजेबाच्या कैदेत होते त्यावेळी, अत्यंत काळजीयुक्त मनाने विनायकभट्टांकडे भविष्य जाणण्यासाठी गेल्या. विनायकभट्ट उत्तम ज्योतिषी होते. त्यांनी महाराज परत येण्याचा दिवस व वेळ अत्यंत अचूक सांगितली. तो पुढे अर्थातच बरोबर ठरला. यामुळे अत्यंत संतुष्ट होऊन, विनायकभट्टांना काही हवे असल्यास सांगा, असे विचारले. त्यावेळी, स्वत:साठी काहिही न मागता, माझ्या मोरयाला गाभारा बांधुन द्या, असे त्यांनी सांगितले. या गाभा-यात अत्यंत पावित्र्याने , सोवळे नेसुनच प्रवेश करता येतो, मुर्तीला स्पर्श करता येत नाही. या पहिल्या गाभा-याची मंडपी चांदीची आहे, शके १८३१ मध्ये बांधलेली आहे. या मुख्य गाभा-याबाहेर दुसरा गाभारा आहे जिथून भक्त श्री मोरयाचे दर्शन घेऊ शकतात. ह्या गाभा-याची मंडपी शके १८४८ मध्येर रावबहादूर केंजळे यांनी बांधली आहे. असे सांगण्यात येते की, श्री. केंजळे यांनी नव्या पुलाचे कंत्राट घेतले होते परंतु कामात यश येत नव्हते व पुल सारखा पडत होता. त्यावेळी त्यांनी श्री मोरयाला कार्यसिद्धीसाठी नवस बोलला व पुलाचे काम पूर्ण झाल्यावर त्यांनी ही चांदिची मंडपी बांधुन घेतली. मुख्य प्रवेशद्वारात चांदीची महिरप असुन दोन्ही बाजुला संगमरवरी हनुमंत आणि गरुड आहेत. तसेच जय-विजय यांची मोठी चित्रे आहेत जी, श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या वडिलांनी काढलेली आहेत. बाहेर सभामंडप आहे व दोन्ही बाजूस सुरुचे पाच महिरपदार खांब आहेत. मंदिराच्या वास्तूचा पुढचा भाग तीन मजली असून सर्वात वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. पुर्वी येथुन रोज सनई-चौघडा वादन होत असे. आजही काही विशेष दिवशी (जसे की भाद्रपद, माघ, ज्येष्ठ उत्सव) येथे सनईवादन होते. 

 कसबा गणपतीची ही मूर्ती गजाननाच्या ओळखीच्या स्वरुपापेक्षा खूपच वेगळी आहे. सततच्या शेंदूरलेपनामुळे मूळ मुर्ती त्या लेपनात लुप्त झाली आहे. ह्या गजाननाच्या डोळ्यांच्या ठिकाणी हिरे आणि नाभिकमलात माणिक जडविण्यात आले आहे. देवाची नित्य उपयोगातील उपकरणी चांदीची आहेत, यात मखर , प्रभावळ, मुकुट, चंद्र, गंध, रिद्धी, सिद्धी यांचा समवेश आहे. दिवसातुन दोनदा गजाननाची पूजा होते. विशेष दिवशी जसे की, विनायकी, संकष्टी चतुर्थी, रंगपंचमी, वर्षातील तीन गणेशोत्सव (माघ, ज्येष्ठ, आणि भाद्रपद) गणपतीला “पोशाख” करण्यात येतो. भाविकांच्या श्रद्धेचे पारणे फेडणा-या पोषाखाचे स्वरुप म्हणजे, देवाला सोवळे, भरजरी शाल, मुकुट, व अनेक अलंकार असे असते. देवापूढे दोन पुरुषभर उंचिच्या समयांमध्ये अहोरात्र नंदादीप तेवत असतो. गाभा-यात मुख्य देवतेशिवाय, नंदी-महादेव, दत्त, देवी यांच्या मुर्ती आहेत. तसेच बाहेरच्या बाजूला हनुमानाचे छोटेखानी मंदीर आहे. कसबा गणपती मंदिराचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे रोज रात्री महासाधू मोरया गोसावी यांची पदे अत्यंत भक्तिभावाने, उत्साहाने आणि मुख्य म्हणजे नित्यनेमाने गायली जातात.

सर्व माहिती संग्रहीत

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या